https://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/2012-03-19/main/MainEdition-MainNews.php
‘संडास बांध ..तरच नांदायला येईन!’
(18-03-2012 : 11:21:26) Share |
||
मेरी बच्ची कुछ गलत तो नही कह रही है। जबतक आप उसकी बात नही मानेंगे, वो नही आएगी’ - लग्नानंतर चौथ्या दिवशी माहेरी निघून आलेल्या एका आदिवासी तरुणीच्या बापाने आपल्या जावयाला हे स्पष्ट सांगितले, तेव्हा त्या जावयाबरोबर त्याच्या गावच्या भावकीतले लोकही होते. या स्पष्टवक्त्या माणसाचे नाव अम्मुलाल कुमरे. मध्य प्रदेशातल्या बेतूल जिल्ह्यात चिचली या छोट्या आदिवासी गावात ते राहतात. गावच्या शाळेत प्राथमिक शिक्षक असलेला हा माणूस समाज काय म्हणेल याची पर्वा न करता माहेरी परतलेल्या आपल्या मुलीमागे उभा राहिला, त्याला कारण होते - संडास. सासरच्या घरी संडास नाही म्हणून लग्नाच्या चौथ्या दिवशी थेट माहेरी निघून आलेल्या या बहाद्दर तरुणीचे नाव अनिता. जन्मापासूनचे सारे आयुष्य आदिवासी पाड्यावर गेलेले. सात भावंडे. त्यातल्या पाच बहिणीतली ही एक. फरक एवढाच, की वडील नव्या विचारांचे. त्यांच्या आग्रहाने अनिता शिकली. तिने पुढे मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. बी.ए.च्या दुसर्या वर्षाला असताना अनिताचे लग्न ठरले. सासर चिचलीपासून जवळच्या रतनपूरचे. जेमतेम दीडेकशे घरांचे छोटे गाव. शिवराम अनिताचे लग्न झाले तेव्हा त्याला नुकतीच शिक्षक म्हणून तात्पुरती नोकरी मिळाली होती. घरात गरिबी. दारिद्रय़च. सासरी आल्यावर अनिताला कळले, आपल्या घरात संडास नाही. पहाटेच्या वा संध्याकाळच्या अंधाराचा आडोसा पाहून ‘बाहेर’ जावे लागणार. जे अनिताच्या घरात; तेच गावातही होते. गरीब असो वा मालदार; सारे ‘बाहेर’च जात. काही लोकांच्या घरी गाड्या होत्या, ट्रॅक्टर होते, पण ही मूलभूत सुविधा नव्हती. शिकल्या-सवरल्या अनिताला हे मान्य झाले नाही. लग्नाच्या चौथ्या दिवशी ती सरळ माहेरी निघून गेली आणि नवर्याला निरोप धाडला - संडास बांधशील तेव्हाच नांदायला येईन. नाहीतर नाही. आधी सार्यांनी हसण्यावारी नेले. पण अनिता पक्की होती. ती बधली नाही. शेवटी गावातल्या वडीलधार्यांना घेऊन शिवराम अनिताच्या माहेरी रदबदलीसाठी गेला. भावकीसमोर उभे राहून अनिताने पुन्हा तेच सांगितले. - तोवर ही बातमी पंचक्रोशीत पसरली. जन्मभराचा संकोच नडलेल्या बाया अनिताचे कौतुक करू लागल्या. पुरुषही हळूहळू तिच्या बाजूने बोलू लागले. रतनपूरच्या ग्रामपंचायतीत तरुण सदस्य. ते एकत्र आले. आपल्या गावाची पंचक्रोशीत ही ‘अशी’ चर्चा व्हायला नको म्हणून त्यांनी शिवरामच्या मागे उभे राहायचे ठरवले. सरकारी योजनेतून शिवरामला थोडी मदत मिळाली. गावकर्यांनी श्रमदान केले; - आणि अनिताच्या दारात संडास उभा राहिला. ती खुशीने नांदायला आली. त्याच आठवड्यात रतनपूरच्या ग्रामसभेने अनिताचा सत्कार केला आणि तिला ५00 रुपयांचे रोख बक्षीस दिले. गोष्ट इथे संपली नाही. रतनपूर आणि आजूबाजूच्या गावात संडास उभे राहू लागले. त्यासाठी सरकारी योजनेतून मदत/ अनुदान मागणार्यांची संख्या वाढली. आणि एकेदिवशी ‘सुलभ इंटरनॅशनल’ या स्वयंसेवी संस्थेने अनिताच्या या धाडसाची दखल घेऊन तिला तब्बल पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आता तर बेतूूल जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाची प्रचारदूत म्हणूनच अनिताची नेमणूक केली आहे. - एवढे सगळे झाले, तरी अनिताचे पाय जमिनीवरून सुटलेले नाहीत. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीने तिला विचारले, ‘एवढय़ा पैशांचे काय करणार तू?’ तर ती म्हणाली, ‘मी शिकणार. नवर्यालाही शिकवणार. चांगलो शिकलो; तरच नोकर्या मिळतील. पैसा काय; आज आला, उद्या जाईल!’ - आणि हो; अनिताकडे मोबाईल नाही, पण संडास आहे. - प्रतिनिधी |